“दादा” लोक्स
समस्या परिहारासाठी बुद्धिमत्ता किंवा
कर्ती बुद्धिमत्ता हे शब्द प्रबोधिनीत आपण वारंवार ऐकलेले असतात. आज त्याचीच प्रचीती मलाही आली.
वेळ संध्याकाळी साधारण सहा वाजताची…
दिवसभर प्रशालेतलं काम उरकून घरी जाण्याची घाई गडबड, घरी गेल्यानंतरच्या कामाचे वेध लागलेले, जाताना वाटेत करून जायच्या कामांची यादीही डोक्यात आकार घेत असलेली… आणि अशा ऐन मोक्याच्या वेळी तुमची गाडी तुमच्याशी पूर्ण असहकार करते…
किमान वीसेक मिनिटं तरी गाडी चालू-बंद-चालू-बंद करण्यात जातात…
शेवटी निराशा, हताशपणा पदरी येतो..
पुढचं काही तासांचं वेळापत्रक सपशेल कोलमडलेलं असतं…
काहीतरी निर्णय घ्यायचा असतो म्हणून पार्किंग मधल्या उतारावरून खाली येऊन तुम्ही प्रबोधिनीबाहेर येऊन रिक्षाची वाट बघू लागता… आता दुसऱ्या दिवशी सकाळचे वेळापत्रकही गडबडणार असतं गाडी जवळ नाही म्हणून… शिवाय दुसऱ्या दिवशीही मेकॅनिकला बोलवा, ती गाडी ताब्यात द्या, फोनाफोनी करून त्या सगळ्या व्यवस्था लावा, त्यात दुसऱ्या दिवशीच्या तासांचं वेळापत्रक सांभाळा… असं खूप काय काय डोक्यात नाचायला लागतं…
त्रागा मनस्ताप अस्वस्थता चिडचिड…
पण अशावेळी “दादा” लोकांमधला पहिला दादा भेटतो…
माझ्यासमोरच्या समस्या निराकरणासाठी तो धडपड प्रयोगशाळेतल्या “दादां”कडे अंगुलीनिर्देश करतो…
माझ्या आशा पल्लवीत होतात… मला शंभर टक्के विश्वास वाटतो…
नव्या उमेदीने 180 च्या कोनात वळून मी परत उतारावरून चढून (!) पार्किंगकडे कूच करते आणि थेट ‘धडपड’ गाठते…
दादाच्या हातात चहाचा कप…
पण माझा केविलवाणा चेहरा पाहून दादा तिथल्या ओव्हनमध्ये कप गरम करायला ठेवतो
आणि…
बोल वत्सा, काय समस्या आहे…?…. या नजरेने माझ्याकडे बघतो…
दादा, गाडी सुरू होत नाहीये, बघतोस का जरा…
दादा आणि त्याचा साथीदार (ना ओळखीचा ना पाळखीचा तरीही अगदी सहज) अजिबातच विलंब न करता माझ्याबरोबर माझ्या गाडीपाशी असतात.
समस्या काय आहे, त्याचं अवलोकन केलं जातं..
😊
मोबाईल बॅटरीच्या परिप्रेक्ष्यात (प्रकाशात!) नेमकी समस्या आणि तिच्या मूळ कारणाचं नीट निरीक्षण केलं जातं…
साईड स्टॅन्ड मध्ये बिघाड आणि त्यामुळे गाडी सुरू होत नाही, असा निर्वाळा दिला जातो…
निदान तर झालं,पण उपाय काय?
सोल्डरिंग करावं लागेल,
थांबा दादाला विचारू…
“दादांमधल्या दादा”ची वाट पाहिली जाते…
काही सेकंदातच दादाची एंट्री होते…
गाडी तिरकी-तारकी करून, अजून नेमकेपणाने परत निरीक्षण केलं जातं…
सोल्डरिंग, वायर कापणे, चिकटपट्टी गुंडाळणे… –
निरीक्षणानंतरच्या पुढच्या टप्प्यावर म्हणजेच कल्पनास्फोट तंत्रावर गाडी (!) गेलेली असते…
पाच-पन्नास कल्पना काढण्या इतका वेळ आणि धीर न दादा लोकांकडे असतो, ना माझ्याकडे असायची काही सुतराम शक्यता असते !!
शेवटी समस्या परिहाराच्या उपायासंदर्भात कमी खर्चिक, कमी वेळखाऊ असा व्यवहार्य निर्णय घेतला जातो…
मोठा दादा खाडखूड करून गाडीच्या वायरींच्या गुंतागुंतीतलं,
साईड स्टॅन्डपासचं एक सॉकेट काढतो…
साईड स्टँड लावलेला असताना गाडी सुरू होत नाही, या सेफ्टीला तो तात्पुरती बगल देतो…
गाडी तुम्ही चालवू शकाल,
फक्त लवकरात लवकर मेकॅनिकला दाखवून तुटलेल्या वायर दुरुस्त करून घ्या, असा सल्लाही मिळतो…
अरेच्या!!
झालं पण?!!
“धन्यवाद दादा!”
असं म्हणून गाडी सुरू करून मी पार्किंगच्या उतारावरून खाली आलेलीसुद्धा असते…
पण मगाशी उतारावरून पायी जाताना असलेली घालमेल आता नसते! त्रागा मनस्ताप अस्वस्थता चिडचिड…
सगळ्याला तिलांजली मिळते आपोआपच!
दादा लोकांबद्दलच्या कृतज्ञतेने मन व्यापून टाकलेलं असतं…
शिवाय कर्त्या बुद्धिमत्तेची प्रचीती आल्यामुळे मन प्रशालेबद्दलच्या अभिमानानेही भरून आलेलं असतं!!!
होय, इथे केवळ तात्त्विक चर्चा घडत नाहीत, तर समस्या निराकरणवर, प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जातो!!!
😊
हृषीकेश दादा
रोहन दादा, हर्ष दादा
प्रणव दादा
मनापासून धन्यवाद!…
जयश्री काटीकर
🌱🌱🌱