Jnana Prabodhini Prashala

📢 The site is under construction. Thank you for your patience and understanding. Please check back shortly for the complete launch.     📢 The site is under construction. Thank you for your patience and understanding. Please check back shortly for the complete launch.     📢 The site is under construction. Thank you for your patience and understanding. Please check back shortly for the complete launch.    

महेंद्रभाई सेठिया: ध्येयवेड्या प्रवासाचे मुखपृष्ठ

ज्ञान प्रबोधिनीची ती अंबाजोगाईतील पहिलीच गणेशोत्सव मिरवणूक असल्याने, संपूर्ण वातावरणात एक वेगळाच उत्साह, शिस्त आणि नवी ऊर्जा ओसंडून वाहत होती. या पहिल्या प्रवासाला अभूतपूर्व कष्टांची जोड लाभली होती. प्रबोधिनीच्या संस्कारांत वाढलेल्या मुलांनी जीव तोडून तालीम केली होती, विविध नृत्यांचे सराव आणि ‘बर्ची’ची ती जबरी तयारी, सर्व काही अगदी परिपूर्ण झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील तो अद्भूत थरार

मिरवणूक जशी अंबाजोगाईच्या मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली, तसा जनसमुदायाचा एक प्रचंड मोठा गोल तयार झाला. त्या विस्तीर्ण गोलाच्या मध्यभागी ‘ध्वज’ खेळायला सुरुवात झाली. त्याकाळी अंबाजोगाईत ध्वज खेळणारे फार मोजकेच आणि नवखे तरुण होते, जे या परंपरेची नुकतीच सुरुवात करत होते.

सगळे काही उत्साहात सुरू असतानाच, अचानक एक तरुण पुढे सरसावतो… अंगावर ज्ञान प्रबोधिनीचा तो अभिमानास्पद आणि शिस्तबद्ध गणवेश, डोळ्यांत एक अदम्य विश्वास आणि हातात मानाचा ध्वज!

त्या तरुणाने जेव्हा तो ध्वज आपल्या हातात घेऊन हवेत फिरवायला सुरुवात केली, तेव्हा संपूर्ण चौकात जणू एक अफाट तरंग पसरला. प्रत्येक पाहणाऱ्याच्या मनाचा ठाव घेणारी ती दृश्ये होती. तो तरुण ज्या जिद्दीने, ज्या अमानुष ऊर्जेने तो ध्वज नाचवत होता, ते पाहून अवतीभवतीचा संपूर्ण अंबाजोगाईचा समाज एका क्षणात शांत, स्तब्ध आणि मंत्रमुग्ध झाला.

त्याच्या हालचालींमधील ते लालित्य, तो अप्रतिम पदन्यास, ती कमालीची गतिशीलता आणि ती खास लकब… सारं काही डोळे दिपवून टाकणारं होतं. तो दोन ते तीन मिनिटांचा काळ असा काही भासला, की पाहणारा प्रत्येक जण थरारून गेला. अंगावर काटा आणणाऱ्या त्या क्षणांनी उपस्थित प्रत्येकाला आतून पूर्णपणे स्तब्ध करून टाकले होते. चौकात उपस्थित असलेले प्रबोधिनीचे कार्यकर्ते तर हा अद्भूत सोहळा पाहून पूर्णपणे ‘गार’ झाले होते!

काळजाचा ठोका चुकवणारे ‘ते’ सत्य…

या थरारक खेळामागचे सत्य जेव्हा उमजते, तेव्हा मात्र अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. कारण, जो तरुण संपूर्ण चौकाला आपल्या तालावर नाचवत होता, त्याचा अवघ्या एक-दोन वर्षांपूर्वीच एक प्रचंड मोठा आणि भयानक अपघात झाला होता! ज्या व्यक्तीने मृत्यूला अगदी जवळून पाहिले होते, अपघाताच्या त्या भयंकर जखमा आणि शारीरिक मर्यादा सोसल्या होत्या, ती व्यक्ती अपघातानंतर इतक्या जबरदस्त ऊर्जेने आणि वेगाने ध्वज खेळवू शकते? अशी कोणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मुळात, ध्वज इतक्या देखण्या आणि भव्य पद्धतीने खेळला जाऊ शकतो, हेच अंबाजोगाईकरांसाठी नवीन होतं; त्यात त्या अपघाताच्या गडद सावलीतून बाहेर पडून एका तरुणाने तो अशा पद्धतीने खेळावा, ही गोष्ट केवळ ‘अशक्यप्राय’ कोटीतील होती.

मर्यादांवर मात करत, अशक्य वाटणाऱ्या गोष्टींना केवळ शक्यच करायचं नाही, तर त्या अत्यंत नावीन्यपूर्ण पद्धतीने लोकांसमोर आणायच्या, हा प्रबोधिनीच्या संस्कारांचा आणि त्या धगधगत्या इच्छेचा जिवंत चमत्कार होता.

तो धगधगता अंगार म्हणजेच दुसरे तिसरे कोणी नसून… ज्ञान प्रबोधिनीचे महेंद्र सेठिया म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके ‘भाई’ होते!

महेंद्रभाई आणि छात्रप्रबोधन

कन्याकुमारीच्या किनाऱ्यावरून निघालेला माझा प्रवास जेव्हा ईशान्येकडील (नॉर्थ-ईस्ट) राज्यांच्या देशाने वळणार होता, पुण्यातल्या परिचितांना, आप्तांना भेटून पुढे जावे या विचाराने मी पुण्यात पाऊल ठेवले. गप्पांचे फड रंगत होते, जुन्या-नव्या आठवणींना उजाळा मिळत होता. या सगळ्या गजबजाटात एक व्यक्ती मात्र सातत्याने माझा शोध घेत होती.

प्रचंड लगबग, घोगरा आवाज, सडपालळ शरीरयष्टी आणि डोळ्यांची एक विशिष्ट उघडझाप असणारे ते व्यक्तिमत्त्व म्हणजे महेंद्रभाई! अरुणाचल प्रदेशातील विवेकानंद केंद्र विद्यालयाच्या मुलांसाठी त्यांना काही पुस्तकांचे संच पाठवायचे होते. ते संच त्यांनी स्वतः बांधले होते, स्वतःच्या हाताने दोरीने घट्ट आवळून तयार केले होते आणि ते त्यांनी माझ्या स्वाधीन केले. त्यावेळी मला त्यांचे नाव माहीत नव्हते, आणि मीही औपचारिकता म्हणून त्यांना नाव विचारले नाही. माझे नाव मात्र त्यांना ठाऊक होते. पुढचा प्रवास सुरू झाला. अरुणाचलच्या भूमीवर पाऊल ठेवल्यानंतर मी विविध शाळांमध्ये गेलो. तिथे जेव्हा जेव्हा पुस्तकं कुठून आली, असा विषय निघायचा, तेव्हा मी सहज म्हणून ‘ज्ञान प्रबोधिनीतून आली आहेत’ एवढंच सांगायचो. पण तिथे गेल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली—तिथल्या विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांमध्ये, शिक्षकांमध्ये ज्ञान प्रबोधिनीच्या एका उपक्रमाबद्दल प्रचंड कौतुक, अपूर्वता आणि कुतूहल होते; ते नाव म्हणजे ‘छात्र-प्रबोधन’ मासिक!

माझ्यासाठी प्रबोधिनी म्हणजे सुरुवातीला फक्त ‘प्रचिती गट’, पुढे ‘भूकंपग्रस्तांसाठी काम करणारी संस्था’, ‘अण्णा हजारे यांचे उपोषण’ किंवा ‘एक दर्जेदार शाळा’ एवढंच मर्यादित आकलन होतं. छात्र-प्रबोधन या मासिकाशी तर माझा दुरान्वयेही संबंध नव्हता. पण अरुणाचलच्या दुर्गम भागात प्रबोधिनीची खरी ओळख ही ‘छात्र-प्रबोधन’ आणि महेंद्रभाई यांच्या रूपाने नसानसात भिनलेली दिसली. छात्र-प्रबोधन या चळवळीचा डंका तिथे मोठा होता. शिक्षकांच्या प्रशिक्षणादरम्यान महेंद्रभाई या नावाभोवती एक वेगळंच वलय निर्माण झालं होतं. त्यांच्याबद्दल ऐकून बरेच काही समजले होते, पण प्रत्यक्ष गाठ पडायला पुढे चार वर्षे जावी लागली.

सिंहगडच्या पायथ्याशी रचलेला विस्तार

पुढे मी महाराष्ट्रात परतलो आणि प्रबोधिनीचे काम पूर्णवेळ करायचे निश्चित झाले. सिंहगडच्या पायथ्याशी प्रबोधिनीची एक प्रदीर्घ बैठक झाली. महाराष्ट्रातील तब्बल १०० तालुक्यांमध्ये ज्ञान प्रबोधिनीच्या कामाचा विस्तार कसा करता येईल, यावर तिथे गंभीर मंथन सुरू होते. आणि या संपूर्ण भव्य योजनेचे प्रमुखपद ज्यांच्याकडे होते, ते दुसरे तिसरे कोणी नसून महेंद्रभाईच होते.

चपळता, बोलण्यातला एक जरब आणि करारीपणा, हाताच्या वेगवेगळ्या कसरती करत संवाद साधण्याची त्यांची ती अनोखी शैली… प्रबोधिनीच्या चौकटीत राहूनही महेंद्रभाईंचे असणे, बोलणे आणि वागणे इतरांपेक्षा एकदम वेगळे आणि उठून दिसणारे होते. हा माणूस १०० तालुक्यांमध्ये काम विस्तारण्याचा विचार करतोय, तो नक्की कोणत्या बळावर? हे समजून घेण्याचे मला मोठे कुतूहल होते.
जेव्हा मी छात्र-प्रबोधनाच्या रचनेचा आणि मराठवाड्याचा अभ्यास केला, तेव्हा त्याचे उत्तर मिळाले. मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात किंवा कोकणात—तालुका आणि जिल्हा पातळीवर, शाळा-महाविद्यालयांमध्ये ज्ञान प्रबोधिनीचे नाव घेतले की दोनच गोष्टी चटकन समोर यायच्या: छात्र-प्रबोधन आणि महेंद्र सेठिया! विषय कोणताही असो, पण त्या विषयाला जोडणारे नाव मात्र एकच असायचे. एका माणसाने आपल्या ध्येयवेडेपणाने आणि भारलेपणाने किती अफाट काम उभे केले असावे, याची प्रचिती मला पावलोपावली येत होती.

भोरचे शिबिर आणि बदललेला ‘पोटेन्शियल डिफरन्स’

महेंद्रभाईंच्या कामाची सर्वात मोठी अनुभूती मला भोर येथील ‘स्काऊट अँड गाईड’च्या मुख्य कार्यालयात आयोजित एका शिबिरात आली. संपूर्ण महाराष्ट्रातील १०० तरुण मुलांचे ते तीन दिवसांचे शिबिर होते आणि हे सगळे तरुण ‘छात्र-प्रबोधन’चे नियमित वाचक होते. तिथे मला ‘भारत २०२०’ या विषयावर मांडणी करायची होती. त्या तीन दिवसांत मला महेंद्रभाईंचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले. त्या तरुणांनाही लाजवेल असा उत्साह त्यांच्यात होता. तरुणांमध्ये आणि महेंद्रभाईंमध्ये वैचारिक चुरस रंगायची, वाद व्हायचे, संघर्ष व्हायचे; पण त्यातून तिथले वातावरण अत्यंत भारलेले आणि जिवंत राहायचे.

मी आजवर कन्याकुमारीची आणि अनेक ठिकाणची योग शिबिरे पाहिली होती, घेतलीही होती. सामान्यतः अशा शिबिरांमध्ये देणारा (शिक्षक) आणि घेणारा(विद्यार्थी) यांच्यातील बौद्धिक व सादरीकरणाची पातळी—ज्याला आपण सायन्सच्या भाषेत ‘Potential Difference’ म्हणू शकतो—तो खूप मोठा असतो. पण छात्र-प्रबोधनच्या या शिबिरात मला वेगळेपण जाणवले. या प्रक्रियेतून घडलेल्या मुलांची क्षमता इतकी वाढलेली होती की, घेणारे आणि देणारे यांच्यातील तो ‘Potential Difference’ खूपच कमी झाला होता. म्हणजेच, या मासिकाने केवळ वाचक तयार केले नव्हते, तर विचार करणारी सक्षम पिढी घडवली होती.

निस्वार्थ कर्माचे अथांग विश्व

पुढे संभाजीनगर असो, लातूर असो वा २००६ नंतरचा माझा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणचा दौरा असो; प्रबोधिनीचे काम छात्र-प्रबोधनाच्या माध्यमातून समाजात किती खोलवर रुजले आहे, हे मी प्रत्यक्ष पाहिले. आजच्या काळात जिथे स्वतःचा फायदा पाहिल्याशिवाय माणूस पाऊल टाकत नाही, समाजात निस्वार्थ कर्माची भावना लोप पावत चालली आहे, अशा काळात स्वतःचा सगळा खर्च करून मासिकासाठी, मुलांसाठी वेळ काढणारी पालक मंडळी, शिक्षक आणि तरुण मुलं महेंद्रभाईंनी जोडली होती. या संपूर्ण विश्वामध्ये, त्या कोवळ्या वयाच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र नवनवीन कल्पना लढवणारा आणि त्या प्रत्यक्षात आणणारा एक ध्येयवेडा माणूस म्हणजे महेंद्रभाई!

माणसाच्या आयुष्यात अशी काही मोजकीच व्यक्तिमत्त्वं येतात, जी केवळ मार्गदर्शक ठरत नाहीत, तर आपल्या जगण्याचा सुवर्णकाळ बनून जातात. माझ्या आयुष्यात ‘भाई’ हे असंच एक अथांग आणि ऋजू व्यक्तिमत्त्व. त्यांच्याशी जडलेलं नातं हे केवळ ओळखीचं नव्हतं, तर ते आत्मिक सुसंवादाचं एक वेगळंच पर्व होतं. त्यांच्या कौटुंबिक विश्वात डोकावण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या भावाच्या घरी जेव्हा मी गेलो होतो, तेव्हा अत्यंत मोकळेपणाने भाईंनी आई-वडिलांच्या जुन्या आठवणींचा पिसारा माझ्यासमोर उघडला. त्या गप्पांमध्ये एक अद्भूत जिव्हाळा होता.

ज्ञान-प्रबोधिनी आणि विविध शाळांच्या असोसिएशनच्या निमित्ताने, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणादरम्यान प्रचंड ऊर्जावान व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडले. आंबेजोगाईच्या योगेश्वरी शाळेतील वि.र. जोशी सर आणि त्यांचे विद्यार्थी जेव्हा स्वयं अध्ययन कौशल्य, बर्ची नृत्य अशा विविध उपक्रमांच्या प्रशिक्षणासाठी आले होते, तेव्हा भाईंचे ते अपार आणि अफाट रूप अगदी जवळून अनुभवता आले. एखाद्या ध्येयवेड्या माणसाला पाहिल्यानंतर जसा ऊर भरून येतो, तसंच काहीसं भाईंना पाहिल्यावर व्हायचं. त्यांच्या बर्ची नृत्यातील तो अफाट जोश, त्यांच्या तासिका, त्यांनी घेतलेले खेळ आणि कल्पकतेच्या पातळीवर जाऊन सांगितलेल्या गोष्टी… हे सगळं अचंबित करणारं होतं.

भाईंना समजून घेताना आम्हा दोघांमधील एक समान दुवा समोर आला, तो म्हणजे आमचे महाविद्यालय—COEP (College of Engineering, Pune). दोघेही सीओईपीचे माजी विद्यार्थी! पुढे दोघांनीही शिक्षण क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, हा दुसरा समान धागा. पण माझा मार्ग सरळ-साधा होता; मी संघटनेच्या माध्यमातून शिक्षणात आलो. भाईं मार्ग मात्र वेगळा होता, भाई मुळातच लढाऊ वृत्तीचे होते! सीओईपी सारख्या नामांकित कॉलेजमधून इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर, कोणी ‘बी.एड.’ (B.Ed. – Bachelor of Education) करण्याचा निर्णय घेईल, ही त्या काळात कल्पनेच्या पलीकडची गोष्ट होती. भाईंनी तो निर्णय घेतला आणि त्यासाठी प्रचंड संघर्ष केला, मोठा लढा दिला. इंजिनिअर माणूस शिक्षण क्षेत्रात येतो, शाळांमध्ये गणित शिकवतो आणि शिवापूरला दारूबंदीच्या चळवळीत हिररीने भाग घेतो, ही त्यांची विविधांगी रूपे स्तिमित करणारी होती.

आप्पांवर (डॉ. आप्पासाहेब पेंडसे) असलेले अफाट प्रेम आणि निष्ठा यांमुळे, घरातील वातावरण विभिन्न असतानाही भाईंचे प्रबोधिनीशी असलेले नाते अतूट राहिले. भाईंचे दौरे म्हणजे एक अफाट झपाटलेपण होतं! कुठेही हॉटेलमध्ये राहायचं नाही, बाहेरचं जेवायचं नाही, केवळ एसटीने किंवा कार्यकर्त्यांच्या सायकलवर आणि दुचाकीवर प्रवास करायचा, हा त्यांचा खाक्या होता. कार्यकर्त्यांच्या घरी जे असेल ते आपुलकीने खायचं आणि त्यांच्या वेळेनुसार झोपायचं. महिन्यातील पंधरा-पंधरा दिवस भाई अफाट भ्रमंती करायचे.
भाईंचा लोकसंपर्क अफाट होता आणि त्यांची ताकद मोठी होती, पण याहूनही अधिक मला भावलेलं भाईंचं वेगळेपण म्हणजे त्यांची नावीन्यतेची आस! मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला जायचो, तेव्हा त्यांच्याकडे काहीतरी नवीन कल्पना असायची. संगणकाची ‘व्हर्जन’ जशी बदलतात, तसं तंत्रज्ञानाचं किंवा पुस्तकांचं बदललेलं व्हर्जन मला भाईंकडे गेल्यावरच समजायचं.

साहित्य क्षेत्रात दिग्गजांचे अहंकार सांभाळून त्यांच्याकडून लेख लिहून घेणे, हे अत्यंत अवघड काम भाईंनी लीलया पेलले. ‘छात्र-प्रबोधन’च्या दिवाळी अंकांसाठी ते सतत नव्या कल्पना मांडायचे आणि प्रत्येक दिवाळी अंकासोबत मिळणारी ‘भेट’ काय असावी, यावर त्यांची कल्पकता अफाट चालायची. मग ते बांबूचे ग्रीटिंग कार्ड असो, राखीचे साहित्य असो, की आकाशकंदिलाचे साहित्य… प्रत्येक गोष्टीत भाईंची अफलातून कल्पकता दिसायची.

एकदा अंबाजोगाई प्रबोधिनीचं वार्षिक वृत्त छापण्यासाठी मी तिथे एक आठवडाभर होतो. त्या वृत्ताच्या पानावरील भाग न् भाग व्यवस्थित वापरला गेला पाहिजे, यासाठी मेटिक्युलसली प्रयत्न करणारे भाई मी जवळून पाहिले. तिथे बाजूलाच छात्र-प्रबोधनची पेज सेटिंग चालायची. अगदी मिलिमीटर आणि सेंटीमीटरच्या भागाचा देखील ते नावीन्याने विचार करायचे. साधा पेज नंबर टाकायचा असला, तरी तो कसा वेगळ्या पद्धतीने टाकता येईल, याचा विचार ते करायचे. हे सगळं खरोखरच अफलातून होतं. ज्ञान प्रबोधिनीचा तत्त्वविचार, स्वयं-अध्ययन कौशल्य, प्रकल्प पद्धती, गटकार्य शिक्षण या सर्व गोष्टी अतिशय सोप्या करून सकल महाराष्ट्राला देणारे भाई खरोखरच ‘ग्रेट’.

आधी मला खूपदा असं वाटायचं की भाई म्हणजे फक्त बुद्धीचा, मस्तिष्काचा वापर करणारे माणूस आहेत. पण जेव्हा ते अफाट ट्रेक्सला जायचे, किल्ले आणि दुर्गभ्रमंती करायचे, तेव्हा त्यांच्यातील शारीरिक क्षमता, कौशल्ये आणि अभिव्यक्ती थक्क करून सोडायची. बर्ची नृत्य करताना शरीरातून वाहणारा तो अफाट जोश त्यांच्यातील सळसळत्या रक्ताची साक्ष द्यायचा. गेल्या २७ वर्षांपासून भाईंमधील ही कल्पकता, नावीन्याचा ध्यास आणि नवनवीन गोष्टी करून पाहण्याची ऊर्मी मी सातत्याने पाहतो आहे. ही ऊर्जा कधी थबकली तर नाहीच, उलट ती दिवसेंदिवस वाढतच गेली. एखादा माणूस इतका क्रिएटिव्ह आणि ऊर्जेने भरलेला कसा असू शकतो, याचं जिवंत उत्तर म्हणजे ‘भाई’! प्रबोधिनीच्या कार्यात स्वतःला समिधेसारखं जळत ठेवून, असंख्य कार्यकर्त्यांच्या आयुष्याला प्रकाश देणारे भाई.

तो अपघात आणि धैर्याची कसोटी

ते दिवस आजच्यासारखे मोबाईलच्या गराड्यात हरवलेले नव्हते. संध्याकाळची ती वेळ मला आजही स्पष्ट आठवते, जेव्हा एक निरोप आला—”भाईंचा अपघात झाला आहे!” नाशिकमध्ये एका ट्रेकला गेले असताना, एका उंच पहाडावरून भाई खाली कोसळले होते. ऐकून पायाखालची जमीनच सरकली. अपघाताची तीव्रता किती असेल, या विचाराने जीव कासावीस झाला होता. दोन दिवस कसेतरी चिंतेत काढले. तिसऱ्या दिवशी अंबाजोगाईच्या एका पीसीओवरून (PCO) भाईंना फोन लावला.

पण भाई ते भाईच! पलीकडून त्यांचा नेहमीसारखाच शांत, निवांत आणि धीरगंभीर आवाज आला, “अरे, काळजी करू नको, व्यवस्थित आहे मी!” त्या अपघाताच्या भीषणतेतही त्यांचा तो संयम मनाला एक अजब उभारी देऊन गेला. पुढे जेव्हा मी त्यांना पुण्यात भेटायला गेलो आणि नंतर आम्ही दोघं चालत मोडकांच्या हॉस्पिटलमध्ये निघालो, तेव्हा डॉक्टर मोडक यांनी दिलेला सल्ला आजही मनात घर करून आहे. डॉक्टर म्हणाले होते, “मला माहिती आहे तुला घाई झाली आहे, तू लवकर काहीतरी करशील; परंतु तुला आता सावकाशच जावं लागेल.” एवढा मोठा अपघात आणि दुखापत होऊनही भाईंनी ज्या पद्धतीने प्रबोधिनीत राहून स्वतःला सावरलं, ते केवळ थक्क करणारं होतं.

माझ्या मनात अनेकदा विचार यायचा की, प्रबोधिनीचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करताना जर कधी असा आणीबाणीचा प्रसंग माझ्यावर आला, तर मी कसा सामोरा जाईन? आपली अशी रचना आहे का? पण भाईंनी त्या संकटावर मात करून, स्वतःच्या उदाहरणातून आम्हा कार्यकर्त्यांना एक नवा वस्तुपाठच घालून दिला.

प्रबोधिनीतील सहवास आणि ‘अल्केमिस्ट’

भाईंबरोबरचा सर्वात जास्त काळ हा प्रबोधिनीतच व्यतीत झाला. अंबाजोगाईहून मी निघालो की प्रबोधिनीत भाईंच्या खोलीवरच माझा मुक्काम असायचा. तिथल्या गप्पा, टप्पा, एकत्र जेवणं आणि वेगवेगळ्या विषयांवर रात्रीचे पैलू उलगडत जाणं, हा माझ्यासाठी एका समृद्ध प्रक्रियेचा भाग होता. भाईंच्या अपघातांतर त्यांच्या खोलीत बसून मी अनेक गोष्टी केल्या. भाईंसमोर बसून एकाच बैठकीत ‘द अल्केमिस्ट’ ही पूर्ण कादंबरी वाचून काढल्याची आठवण आजही माझ्या मनात ताजी आहे.

विस्तारक योजनेच्या अंतर्गत भाई जेव्हा नवीन नवीन गोष्टींचं नियोजन करायचे, तेव्हा त्यांच्या कल्पकतेत आणि उपक्रमांमध्ये सहभागी होणं हा एक विलोभनीय अनुभव असायचा. त्यांचा विचार अफलातून होता आणि नवतेचा ध्यास हा त्यांच्या जगण्याचा स्थायीभाव होता.

“मासिक हे माध्यम आहे, माणसांची निर्मिती हे ध्येय!”

एका मराठी साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाची आठवण. त्या कार्यक्रमाला कुमार सप्तर्षी आले होते. छात्र-प्रबोधनचा एकूण खप आणि मिळालेला पुरस्कार पाहून त्यांनी थोडीशी तिरकस टिप्पणी केली. कार्यक्रमानंतर मी जरा चक्रावून भाईंना विचारलं, “या पुरस्कारावर आणि त्यांच्या तिरकस टिप्पणीवर तुमचं काय मत आहे?”

“अरे, आपलं काम मुलांपर्यंत पोहोचणं आहे. मुलांचा चहूअंगांनी विकास करणं, त्यांना उद्योगी आणि उपक्रमशील करणं हे आपलं मुख्य कर्तव्य आहे. अशी जास्तीत जास्त मुलं उभी राहणं आणि त्यांनी देशसेवेचा, देशप्रश्नांचा विचार करणं, हे आपलं खरं काम आहे. मासिक हे केवळ एक माध्यम आहे. त्याचा खप किती होतो, यापेक्षा त्यातून किती माणसं उभी राहतात, हे जास्त महत्त्वाचं आहे!”
हा विचार माणसांच्या घडणीवर (Man-making) विश्वास ठेवणाऱ्या एका खऱ्या द्रष्ट्या नेत्याचा होता.

कल्पक प्रयोगांचा ध्यास

वाचन प्रकल्पाच्या निमित्ताने प्रबोधिनीत भाईंनी सुरू केलेली ‘एक पानी पुस्तक’, ‘चार पानी पुस्तक’ ही संकल्पना तर मला प्रचंड भावली. पुस्तकांची ही सुटसुटीत आणि आकर्षक संकल्पना आजही मी माझ्या कामात उपयोगात आणतो. डोंबिवली आणि बोरीवलीच्या भागात जेव्हा मी भाईंबरोबर काम करू लागलो, तेव्हा मला प्रकर्षाने जाणवलं की भाईंनी किती छान पद्धतीने, प्रेमाने माणसांना जोडलं आहे आणि जपलं आहे. माणसांना एकत्र बांधून ठेवण्याची त्यांची ही कला थक्क करणारी होती.

‘भाई’ : एक अथांग आणि ऋजू व्यक्तिमत्त्व

प्रबोधिनीच्या ‘मध्यवर्ती सविचार समिती’चा सदस्य म्हणून काम करण्याची संधी जेव्हा मला मिळाली, तेव्हा भाईंचे खरे वेगळेपण मला अगदी जवळून अनुभवता आले. त्या समितीमध्ये भाईंचे जे मांडणे असायचे, विषयाचे जे प्रतिपादन असायचे, ते थक्क करणारे होते. कोणताही क्लिष्ट विषय अत्यंत सहजतेने समजून घेणे, त्याचे विश्लेषण करणे आणि त्या पाठीमागचा ज्ञान प्रबोधिनीचा मूळ तत्त्वविचार जपणे, ही भाईंची हातोटी वाखाणण्याजोगी होती. एखाद्या विषयाच्या मुळाशी जाऊन, त्याचा व्यापक विचार कसा करावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाई!
भाईंचे मला जाणवलेले सर्वात खास आणि अद्भूत वेगळेपण कोणते असेल, तर ते म्हणजे—’प्रत्येक माणसाला त्याच्या क्षमतेनुसार आणि त्याच्या वेळेनुसार काम देण्याची त्यांची अफाट क्षमता!’

आजच्या गतिमान युगात जिथे प्रत्येकाकडे वेळेची कमतरता आहे, तिथे भाईंकडे माणसांसाठी वेळेचा जणू अखंड साठा असायचा. छात्र प्रबोधनच्या कार्यालयात भाई जेव्हा बसलेले असायचे, तेव्हा तिथले वातावरण एका मोठ्या कुटुंबासारखे वाटे. तिथे एखादी वृद्ध माऊली यायची आणि म्हणायची, “भाई, माझ्याकडे आज दोन तास आहेत.” भाई तितक्याच आपुलकीने हसून म्हणायचे, “अरे, आहे ना! तुमच्यासाठी काम आहे.” तर कधी एखादा तरुण मुलगा उत्साहाने यायचा आणि म्हणायचा, “भाई, माझ्याकडे फक्त रविवारचाच दिवस आहे.” भाई त्यालाही तितक्याच उत्साहाने सांगायचे, “नक्कीच! माझ्याकडेही तुझ्यासाठी काम आहे.”
वयाचे, कुवतीचे किंवा पदाचे कोणतेही बंधन न ठेवता, जो माणूस समोर येईल त्याला आपलेसे करणे आणि त्याला काम देणे, ही भाईंची वृत्ती थक्क करणारी होती. माणसाच्या क्षमतेनुसार त्याला समजून घेणे आणि त्याच्या गतीने त्याच्याशी संवाद साधणे, हा भाईंचा उपजत गुण.

‘भाई’ : बदललेली जबाबदारी आणि न बदललेलं आत्मतत्त्व!

परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे, पण काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्या आयुष्यातील जबाबदाऱ्यांची पानं बदलली, तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सुगंध तोच राहतो. ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाह म्हणून सूत्रे हाती घेतलेले आपले ‘भाई’ हे याचंच एक चालतं-बोलतं उदाहरण! ज्ञान-प्रबोधिनीच्या अनेक विभागांचे प्रमुख म्हणून त्यांनी आजवर काम पाहिलं आहे. छात्रप्रबोधिनीची धुरा तर त्यांनी अत्यंत लीलया आणि कौशल्याने सांभाळली.

पण जेव्हा त्यांच्यावर कार्यवाह पदासारखी एक मोठी आणि व्यापक जबाबदारी आली, तेव्हा माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या मनात एक अनाहूत शंका डोकावून गेली. वाटलं की, आता या मोठ्या पदाच्या व्यापात भाईंचा लहान मुलांशी, शिक्षकांशी असलेला तो थेट आणि जिव्हाळ्याचा संपर्क कमी तर होणार नाही ना? त्यांची ती अफाट चपळाई, ते आपलेपण आणि मुलांसमोर ठेवलेली अवाढव्य आव्हाने… या सगळ्यात काही अंतर तर पडणार नाही ना? मुलांमध्ये एक वेगळीच चेतना आणि स्फुल्लिंग निर्माण करण्याची त्यांची ती अंगभूत ताकद या नव्या जबाबदारीच्या चौकटीत कुठेतरी धूसर तर होणार नाही?

अशीच एक शंका मनात घेऊन मी अहमदपूरच्या ‘कुमार साहित्य संमेलना’ला निघालो. हे संमेलन मराठवाड्यात होतं, त्यामुळे तिथे जाणं तर निश्चितच होतं; पण जेव्हा समजलं की तिथे ‘भाई’ येणार आहेत, तेव्हा मात्र मी तिथली माझी उपस्थिती अगदी पक्की करून टाकली. मनात कुठेतरी त्या शंकेचं उत्तर शोधायचं होतं.
संमेलनाच्या सुरुवातीला मला असं वाटलं होतं की, आता इतक्या मोठ्या पदावर आल्यामुळे भाई कदाचित फक्त एका ‘मार्गदर्शकाच्या’ भूमिकेत दिसतील. स्टेजवर येतील, मार्गदर्शन करतील आणि औपचारिकपणे निघून जातील. पण प्रत्यक्षात जेव्हा मी तिथे गेलो, तेव्हा तिथले दृश्य पाहून मनातील साऱ्या शंका क्षणात विरघळून गेल्या… तिथे मला परत तेच आणि तसेच ‘भाई’ दिसले!
तेच भाई… जे विद्यार्थ्यांना नवनवीन आव्हाने देत होते, त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा देत होते आणि त्यांच्यात एक नवा जोश भरत होते. शिक्षकांशी अत्यंत आपलेपणाने हितगूज साधत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या मनातील अफाट योजना ते तितक्याच उत्साहाने मांडत होते.

आणि खरा जिवंत अनुभव तर जेवणानंतर आला…

दुपारच्या जेवणानंतर जेव्हा मुलांचे कल्पक खेळ सुरू झाले, तेव्हा भाई स्वतःला पूर्णपणे विसरून त्या लहान मुलांमध्ये थेट सामील झाले! त्या बालदोस्तांशी एकरूप होऊन, त्यांच्याच सुरात सूर मिसळत भाईंनी जो अपार आनंद घेतला, तो पाहण्यासारखा होता. पदाचा कोणताही बडेजाव नाही, चेहऱ्यावर कोणताही ताण नाही; फक्त आणि फक्त मुलांबद्दलचं अथांग प्रेम!

होय, भाईंचे कामाचे स्वरूप नक्कीच बदलले असेल, त्यांच्या जबाबदाऱ्यांचा परीघ अधिक विस्तारला असेल, आणि या नव्या भूमिकेमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक वर्धिष्णू आणि समृद्ध झाले असेल. परंतु, भाईंमधील जी मूळ चेतना आहे, जे ऊर्जावान आत्मतत्त्व आहे, ते आजही त्याच तेजाने, त्याच नावीन्याने आणि त्याच अथांग आपुलकीने नटलेले आहे, सजलेले आहे आणि संस्कारित आहे!
कार्यवाह पदाची वस्त्रे परिधान करूनही, भाईंमधला तो ‘बालसखा’ आणि ‘प्रेरणास्थान’ असलेला कार्यकर्ता आजही तितकाच जिवंत आहे, हेच अहमदपूरच्या त्या संमेलनाने अधोरेखित केले.

प्रार्थनेचा जिवंत हुंकार: ‘भाई’

महेंद्रभाईंचे जीवन म्हणजे ज्ञान प्रबोधिनीच्या प्रार्थनेचे केवळ गायन नव्हे, तर तो अक्षशः कृतीतून प्रकटलेला एक जिवंत अविष्कार आहे. प्रार्थनेतील “घेऊन व्रत न हे अम्हि अंधतेने, बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे” या ओळी भाईंच्या जगण्याचा मूळ गाभा आहेत.

नाशिकच्या त्या भीषण अपघातात मृत्यूच्या दारातून परत आल्यानंतरही, त्याच अमानुष ऊर्जेने आणि जिद्दीने पुन्हा उभे राहून अंबाजोगाईच्या चौकात मानाचा ध्वज हवेत लिलया फिरवणे, ही त्यांच्यातील “वर्तू अम्ही दृढप्रसन्न नि ध्येयधुंद” आणि “सोडू कधी न पथ हा चिर ठेवु आशा” या अदम्य विश्वासाची पराकाष्ठा होती.

“ही हिंदुभू परमश्रेष्ठपदास न्याया, आम्ही कृती नित करू झिजवोनि काया” या प्रमाणे, कार्यात स्वतःला समिधेसारखे जळत ठेवून कार्यकर्त्यांच्या शेकडो पिढ्यांना चैतन्याचा प्रकाश देणारे महेंद्रभाई म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके ‘भाई’ हे या प्रार्थनेचे चालते-बोलते रूप आहेत. अशा या ध्येयवेड्या, ऋजू आणि अथांग व्यक्तिमत्त्वाचा सहवास लाभणे, हे आपल्या सर्वांच्याच जगण्याचे एक सुवर्णपर्व आहे!

@all

मुलांचे अवांतर पुस्तकांचे वाचन झाले पाहिजे, यासाठी घरोघरी गाडी करून पुस्तके पाठवण्यात आली. मुलांच्या बुद्धीला जशी चालना मिळायला पाहिजे, तशीच बुद्धीबरोबर त्यांच्या हस्तकौशल्याला आणि इतर कौशल्यांनाही चालना मिळाली पाहिजे; म्हणून ‘धडपड प्रयोगशाळेतले’ किट तयार करण्यात आले आणि मुलांना ते देण्यात आले.

ज्या वेळी मोठमोठ्या युनिव्हर्सिटीज, मोठमोठ्या शाळा, कॉर्पोरेट शाळा, मातब्बर संस्थांच्या आणि राजकीय महर्षींच्या शाळा बंद पडलेल्या होत्या; त्या वेळी मात्र एक शाळा अविरत चालू होती, ती म्हणजे ‘ज्ञान प्रबोधिनी’. आणि याची सगळी रचना लावणारे होते—ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे प्राचार्य मिलिंद नाईक.
ज्ञान प्रबोधिनी ही एका विशिष्ट उद्देशाने सुरू झालेली शाळा आहे. तो उद्देश जर साध्य झाला नाही, तर शाळा चालवण्याला काय अर्थ आहे? “त्या उद्देशाशी आम्ही कॉम्प्रमाईज (तडजोड) करणार नाही, त्या ध्येयाशी कॉम्प्रमाईज करणार नाही.” नेमका याच वेळी काही विघ्नसंतोषी लोकांनी प्रबोधिनीच्या या पद्धतीवरच आक्षेप घेतला.

नवीन प्रवेश झालेले होते आणि प्रवेशावर म्हणजेच नवीन तुकडी सुरू करण्यावर शासकीय बंदी घालण्यात आली. ‘मुलांचे प्रवेश नाकारून, प्रवेश रद्द करून त्यांना परत आधीच्या शाळेत पाठवावे’, असा एक मतप्रवाह होता. मिलिंदच्या पाठीशी मानसिक आणि बौद्धिक बळ देणारे प्रबोधिनीचे सर्व ज्येष्ठ-श्रेष्ठ खंबीरपणे उभे होते, परंतु प्रत्यक्ष पालकांना सामोरे जायला मिलिंदला स्वतःला जावे लागणार होते. मिलिंदने अतिशय खंबीरपणे त्या पालकांचा सामना केला (फेस केले). प्राचार्य होऊन केवळ दोनच वर्षे झाली होती, पण खंबीरपणे लढून तो या लढ्यामध्ये यशस्वी झाला आणि प्रबोधिनी यशस्वी झाली.

असे एक नाही, अनेक प्रसंग आहेत, ज्या वेळी मिलिंदचे धैर्य एकदम पणाला लागले होते.

मिलिंदची आणि माझी दोस्ती जवळपास ३३ वर्षे जुनी आहे. मिलिंदला प्रशालेमध्ये काम सुरू करून आता २९ वर्षे झाली आहेत.
स्वामी विवेकानंद म्हणतात, “Take up one idea. Make that your idea to your life. Think of it, dream of it, live on that idea. Leave every other idea alone. This is the way to success.”

तैत्तिरीय उपनिषदातला वारुणीचा पुत्र भृगु याला ब्रह्मजिज्ञासा होते आणि ब्रह्मज्ञान म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी तो एक-दोन नाही, तब्बल ६० वर्षे तपश्चर्या करतो—‘तपो ब्रह्मेति’. एखादा विषय घ्यावा आणि त्याने भारून जावे, त्याच्या पाठीमागे असे लागावे की—”One Life, One Mission”. अशी ही भारतीय ज्ञानग्रहणाची प्रक्रिया आहे. मिलिंद त्या प्रक्रियेचाच एक घटक आहे, पाईक आहे. त्याची जवळपास अडीच दशकांची, म्हणजेच दोन-अडीच तपांची तपश्चर्या झालेली आहे आणि पुढेही ती अशीच चालू राहणार, याबद्दल शंका नाही.
मिलिंद हे नाव आठवल्याबरोबरच ३३ वर्षांपूर्वीचा मिलिंद डोळ्यांसमोर येतो.

अण्णासाहेब हजारेंचे आंदोलन आणि त्यांची (अण्णासाहेबांची) जबाबदारी ही ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांकडे होती. अण्णा प्रबोधिनीचे उपाध्यक्ष होते. ती जबाबदारी माझ्यावर आणि मिलिंदवर सोपवण्यात आलेली होती. आमच्या दोघांच्या वयामध्ये तीन-चार वर्षांचे अंतर होते, पण मिलिंदने ज्या प्रेरणेने आणि ज्या ताकदीने मला त्या प्रक्रियेमध्ये मदत केली, सोबत केली, ती अफलातून होती.
आगे तो शिक्षण क्षेत्रामध्ये पूर्णपणे उतरला, तर मी विवेकानंद केंद्राच्या मार्गाने निघून गेलो. मी जेव्हा परत आलो, तेव्हा मिलिंदला राहवले नाही आणि तो अंबाजोगाईला आला. अंबाजोगाईत त्याने माझ्याशी भरपूर गप्पा मारल्या; त्या वेळी त्याच्या मनात एकच ध्यास होता की, ज्ञान प्रबोधिनीचे एक ‘बी.एड. कॉलेज’ असले पाहिजे. सदैव काहीतरी इच्छा मनात ठेवून—’प्रबोधिनीचे हे असले पाहिजे, प्रबोधिनीचे ते असले पाहिजे, प्रबोधिनीचे असे झाले पाहिजे, प्रबोधिनीचे तसे झाले पाहिजे’—असा सतत चिंतन करणारा हा मिलिंद!

त्यानंतर प्रबोधिनीचे पहिले शिबिर जेव्हा अंबाजोगाईत झाले, त्या वेळी पूर्ण सात दिवस, क्षणोक्षणी प्रत्येक गोष्ट नेमकेपणाने आणि चोख लावून करणारा मिलिंद माझा सहकारी होता.

पुढे ‘ग्रामीण प्रज्ञा विकास योजना’ असू द्या, किंवा ज्ञान प्रबोधिनीची ‘प्रबोधशाळेतली प्रयोगशाळा’ सेट करणे असू द्या, अशा अनेक गोष्टींमध्ये मिलिंदचे सहकार्य अफलातून होते. प्रशालेमध्ये शिकणारा, प्रत्येक परिस्थितीत सोबत असणारा सहकारी, अण्णांच्या आंदोलनामध्ये सोबत असलेला मित्र आणि ज्ञान प्रबोधिनी, अंबाजोगाईची उभी करत असताना सुरुवातीचा सगळ्यात मोठा आधार असणारा प्रबोधक—असा हा आमचा मिलिंद मंदार नाईक!

मूळचे बेळगावचे असलेले मिलिंदचे कुटुंब वडिलांच्या सेंट्रल एक्साईजमधील नोकरीमुळे महाराष्ट्रात (पुण्यात) आले. बालपण प्रभात रोडवरील अवघ्या दोन खोल्यांच्या घरात गेले, पण तिथूनच त्याच्या पंखांना व्यापक ध्येयांचे बळ मिळाले.
बालशिक्षण मंदिर आणि त्यानंतर ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत त्याचे शिक्षण झाले. सुरुवातीपासूनच त्याचा स्वभाव एखाद्या झऱ्यासारखा प्रवहमान होता. कधीही शांत न बसणे, सतत काहीतरी नवीन करून पाहणे, हा त्याचा उपजत पिंड होता.

संघटनात्मक कौशल्य आणि जनसंग्रह

मिलिंदच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा पैलू म्हणजे ‘माणसं जोडण्याची कला’. प्रबोधिनीच्या संस्कारांमुळे त्याची संघटन वृत्ती कॉलेज जीवनात अधिक बहरली. गरवारे कॉलेजमध्ये असताना त्याने ‘प्रचिती’ हा विद्यार्थ्यांचा गट सुरू केला. कॉलेजमध्ये तो सायन्सला होता. आपल्या अफाट उत्साहाने त्याने सर्वांना एकत्र आणले. या गटाच्या माध्यमातून त्याने दुसऱ्याच वर्षी सामाजिक प्रश्नांवर व्याख्यानमाला आयोजित केली होती, जी त्याच्यातील नेतृत्वगुणांची प्रचिती देणारी होती.

त्याची हीच ऊर्जा स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्येही पाहायला मिळाली. तिथल्या वेगवेगळ्या वयोगटांतील विद्यार्थ्यांना त्याने प्रबोधिनीशी जोडले आणि त्यांना समाजकार्याची ओळख करून दिली.

संशोधनाची ओढ आणि निस्पृह वृत्ती

एम.एस्सी. (M.Sc.) च्या शिक्षणासाठी मिलिंद प्रवरानगरला गेला. तिथेही तो अत्यंत सक्रिय विद्यार्थी म्हणून नावारूपास आला. कॉलेजमध्ये पुरेशी साधने नसतानाही, हव्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी तो श्रीरामपूर किंवा पुण्यात चकरा मारत असे. या जिद्दीमुळेच एम.एस्सी.च्या द्वितीय वर्षात असतानाच त्याचा शोधनिबंध ‘सिंथेटिक केमिस्ट्री’ (Synthetic Chemistry) या नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला.

त्याच्या या गुणवत्तेमुळे त्याला तैवानमधून थेट पीएच.डी. (Ph.D.) ची सुवर्णसंधी चालून आली होती. पण मिलिंदका ध्यास वेगळा होता. पैशांबद्दल आणि मोबदल्याबद्दल तो सुरुवातीपासूनच पूर्णपणे ‘निरीच्छ’ होता. त्याने ती आंतरराष्ट्रीय ऑफर नाकारली आणि ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत शिक्षक म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला.

सेवेचा वसा आणि मार्गदर्शकांचा प्रभाव

त्याच्या या प्रवासात अनेक दिग्गजांचे संस्कार कारणीभूत ठरले. प्रबोधिनीच्या शालेय वातावरणात त्याच्यावर गिरीशराव आणि विशेषतः विवेकराव कुलकर्णी यांचा प्रचंड प्रभाव होता. मिलिंदचे कार्य केवळ शाळेपुरते मर्यादित नव्हते.

• त्याने अशोक विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रबोध दल’ चालवले.
• लोणावळ्यातील ‘सेव्ह द चिल्ड्रन कॅनडा’च्या बालग्रामात अनाथ मुलांसाठी त्याने सलग तीन वर्षे शनिवार-रविवार देऊन काम केले.

१९९३-९४ च्या सुमारास सुरू झालेला हा प्रवास पुढे १९९७ मध्ये एका शिक्षकाच्या रूपाने वर्गात पोहोचला. पण हे शिक्षकी पेशाचे वर्तुळ केवळ शाळेच्या चार भिंतींपुरते मर्यादित नव्हते. ‘ग्रामीण प्रज्ञा विकास’ प्रकल्पाच्या माध्यमातून या ध्येयवेड्या शिक्षकाने ग्रामीण भागातील गुणवत्तेला आकार देण्याचे एक व्रतच हाती घेतले होते.

त्या काळात त्याच्याकडे एक स्कूटर होती. आळवड्यातून दोन दिवस, कधीही न चुकता, ती स्कूटर भोरमधील ‘रावडी’ आणि वेल्ह्याजवळील ‘पाबे’ या गावांच्या दिशेने धावायची. ऊन-पाऊस, खडतर रस्ते कशाचीही तमा न बाळगता, मुलांच्या भविष्यासाठी त्याचे हे पाय कधीच थबकले नाहीत.

हक्काचा माणूस

त्याचा स्वभावच असा की, तो जिथे गेला तिथे त्याने माणसांची मने जिंकली. शाळेतील सर्व शिक्षकांसाठी तो अत्यंत लाडका आणि आदरणीय होता. पण त्याचे काम केवळ वर्गात शिकवण्यापुरते नव्हते. मुलांच्या थेट घरी जाऊन त्यांच्या पालकांशी संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे हा त्याच्या दिनक्रमाचा भाग होता. केवळ अभ्यासापलीकडे जाऊन मुलांमध्ये ‘स्वयंअध्ययन’ आणि प्रबोधिनीच्या मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी त्याने अनेक शिबिरे घेतली. दिवसा शाळेत मुलांशी संवाद साधायचा आणि संध्याकाळी संपूर्ण गावात फिरून प्रत्येकाच्या सुख-दुःखात सामील व्हायचे, हा त्याचा अनोखा स्वभाव होता.
बीज रोविले… वृक्ष बहरले!
त्याच्या या निस्वार्थी प्रयत्नांतून अनेक हिरे घडले. आज भलेही त्या कामाला २०-२५ वर्षे झाली असतील, पण त्याने लावलेली ती रोपे आज उत्तुंग वृक्ष बनून समाजाची सेवा करत आहेत. त्यातील काही प्रातिनिधिक उदाहरणे म्हणजे त्याच्या कार्याची खरी पावती:

• राम रेणुसे (पाबे): पाबे गावातून आलेला हा मुलगा प्रबोधिनीच्या संस्कारात वाढला. सुरुवातीला संगणक कर्मचारी म्हणून रुजू झालेला राम, आज आपल्या अंगभूत उद्योगी वृत्तीमुळे आणि ‘विज्ञान आश्रम पाबळ’मधील शिक्षणामुळे संगणक हार्डवेअरच्या कामात उत्तम प्रकारे सेटल झाला आहे.
• सचिन ओव्हाळ (रावडी): रावडी गावचा सचिन आज प्रशालेमध्ये सर्व कर्मचारी सदस्यांचा प्रमुख म्हणून अत्यंत जबाबदारीने आणि कुशलतेने काम पाहत आहे.
• लीना ओव्हाळ (रावडी): कौटुंबिक परिस्थिती बेताची असतानाही, तिच्यातील चमक ओळखून या शिक्षकाने (मिलिंदने) तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली. पुढे याच मार्गदर्शनातून लीनाने स्पर्धा परीक्षा दिली आणि आज ती एक उत्तम अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
माणुसकीचा अखंड झरा

ज्यांना शिक्षणासाठी पैशांची नड होती, त्यांना आर्थिक मदत करणे, ग्रामीण भागातील मुलांना पुण्यात आणून त्यांच्या राहण्याची-खाण्याची सोय स्वतःच्या घरी किंवा नातेवाईकांकडे करणे, यात त्याला कधीच परकेपणा वाटला नाही. आज इतक्या वर्षांनंतरही, जेव्हा तो त्या भागात जातो, तेव्हा जुने शिक्षक आणि विद्यार्थी आदराने आणि मायेने त्याला बोलावतात. काळ बदलला, वर्षे सरली, पण त्याने जोडलेली ही माणसे आणि आपुलकीचे संबंध आजही तितकेच घट्ट आणि ताजे आहेत. हेच एका खऱ्या शिक्षकाचे आणि समाजसेवकाचे सर्वात मोठे संचित आहे!

तीन महत्त्वाच्या लढाया आणि ‘पाषाण’चे स्वप्न

मिलिंदच्या प्राचार्यपदाच्या कारकिर्दीत एकाच वेळी तीन मोठ्या आघाड्यांवर संघर्ष सुरू होता. पहिली लढाई होती प्रशालेवर आलेले कायदेशीर संकट (कोर्ट केस), दुसरी लढाई नव्या शैक्षणिक धोरणाची पायाभरणी आणि तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे ‘पाषाण’च्या जागेचा प्रश्न. पाषाणच्या जागेवर अनेक कायदेशीर आणि प्रशासकीय बंधने होती. ती सर्व बंधने शिथिल करून तिथे प्रत्यक्ष बांधकाम करण्याची परवानगी मिळवणे, हे अत्यंत जिकिरीचे काम होते. अनेक वर्षांची ही कायदेशीर झुंज आणि मुंबईच्या अविरत वाऱ्या केल्यानंतर, अखेर दोन वर्षांपूर्वी या संघर्षाला यश आले. तिथे कामाची एक नवी आशा निर्माण झाली आहे. प्रत्यक्ष काम सुरू होण्याच्या मार्गात अजूनही जे दैनंदिन अडथळे येतात, त्याविरुद्ध मिलिंदची अविरत लढाई आजही सुरू आहे.

साहित्यिक योगदान आणि वर्तमानपत्रातील लेखन

त्याचे वैचारिक आणि साहित्यिक योगदानही तितकेच व्यापक आहे. प्रशालेत रुजू झाल्यानंतर अवघ्या दोन-तीन वर्षांतच, म्हणजेच २००४ च्या ‘वैज्ञानिक जागरूकता वर्षा’त त्याने ‘सकाळ’च्या ‘बालमित्र’ पुरवणीमध्ये ‘दैनंदिन आयुष्यातील विज्ञान’ हे सदर चालवले. त्याच वेळी त्याने ‘वैज्ञानिक प्रश्नोत्तरांवर’ आधारित एक स्वतंत्र सदरही चालवले होते. त्याचे हे शैक्षणिक आणि विज्ञानविषयक लेखन अविरत सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने ‘करिअर’ या विषयावर वर्षभर लेखन केले, तर चालू वर्षात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’तील (NEP) विविध शैक्षणिक विचारांवर आधारित त्याची अभ्यासपूर्ण लेखमाला वर्तमानपत्रातून नियमितपणे प्रसिद्ध होत आहे. याशिवाय त्याने तंत्रज्ञान आणि प्रकल्प पद्धतीच्या शालेय पाठ्यपुस्तकांचेही लेखक (Author) म्हणून लेखन केले आहे.

८० कार्यकर्त्यांचे बळ आणि ‘पालक संघाची’ अभिनव उभारणी

आज प्रशालेमध्ये ३० पूर्णवेळ शिक्षक आणि १० शिक्षकेतर कर्मचारी आहेत. याशिवाय अर्धवेळ व तासांनुसार त्याने येणारे शिक्षक धरले तर ६५ शिक्षकांचा आणि एकूण ८० कार्यकर्त्यांचा मोठा चमू मिलिंदच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. या संपूर्ण प्रवासात त्याने ‘पालक संघाची’ केलेली उभारणी अत्यंत कौतुकास्पद आहे. पूर्वी पालकांना शाळेपासून थोडे दूर ठेवण्याची पद्धत होती, पण मिलिंदने ती व्यवस्था बदलून पालकांना प्रशालेचे अविभाज्य घटक बनवले. आज हा पालक संघ केवळ नावाला उरलेला नाही, तर त्यांचे ‘गडकिल्ले संवर्धन’, ‘सहली’ आणि ‘अभिव्यक्ती’ सारखे विविध गट कार्यरत आहेत. आजच्याच दिवशी या पालक संघाने ‘अभिव्यक्ती’ अंतर्गत बसवलेले एक सुंदर नाटक सादर केले आहे, जे गेल्या ३-४ वर्षांतील त्यांच्या सक्रियतेचे उत्तम उदाहरण आहे.
तंत्रज्ञानाची क्रांती आणि शैक्षणिक प्रयोग

प्रशालेमध्ये तंत्रज्ञान (Technology) खूप लवकर आणण्याचे दूरदृष्टीचे काम मिलिंदने केले. विचार मांडणे सोपे असते, पण ते प्रत्यक्ष कृतीत आणणे कठीण असते; मिलिंदने संगणक प्रणाली आणि आधुनिक तंत्रज्ञान प्रशालेच्या दैनंदिन कामकाजात यशस्वीपणे रुजवले. त्याच्या काळात प्रशालेमध्ये केवळ प्रयोग झाले नाहीत, तर त्या प्रयोगांना एक निश्चित दिशा (‘स्ट्रीमलाईन’) देण्यात आली. इंग्रजी आणि गणित या विषयांसाठी त्याने सुरू केलेली ‘स्तर पद्धती’ (Ability-based Learning) हा याचाच एक भाग आहे. विद्यार्थ्याला ज्या पातळीवरून समजते, तिथून त्याला शिकवण्याची ही पद्धत प्रशालेच्या गुणवत्तेत भर घालणारी ठरली.

तंत्रज्ञान, कला आणि अभिव्यक्तीचा त्रिवेणी संगम

प्रबोधिनीमध्ये अनेक प्रयोग वर्षानुवर्षे चालत आले आहेत, परंतु त्यांना एक सुविहित रूप (Streamline) देण्याचे मोठे श्रेय मिलिंदकडे जाते. विशेषतः ‘कला शिक्षण’ ज्याला आपण ‘अभिव्यक्ती’ म्हणतो, त्याची एक अत्यंत उत्तम व्यवस्था त्याने बसवली. केवळ शिकणे पुरेसे नाही, तर आपण काय शिकलो हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवणे महत्त्वाचे असते, यावर त्याचा ठाम विश्वास होता. म्हणूनच दरवर्षी होणाऱ्या ‘अभिव्यक्तीच्या प्रात्याक्षिकाने’ नेहमीच एक नवी उंची गाठली. केवळ प्रयोगांच्या पातळीवर न रेंगाळता, त्याला एक शाश्वत स्वरूप देण्याचे कौशल्य मिलिंदने दाखवले. त्याचप्रमाणे, ‘अग्रणी योजने’च्या माध्यमातून मुलांमधील ‘लीडरशिप’ वाढवण्यासाठी त्याने सखोल अभ्यास केला. मुलांचे नेतृत्वगुण केवळ पुस्तकी न राहता, ते प्रत्यक्ष जगण्यात उतरावेत यासाठी त्याने अत्यंत योजनाबद्ध आखणी केली.

‘सर्वंकष मूल्यमापन’

शिक्षणाच्या क्षेत्रात मिलिंदने केलेले दोन प्रयोग मैलाचे दगड ठरले. पहिला म्हणजे ‘अभिमित्र’ (Mentor) ही संकल्पना. प्रत्येक वर्गाला एक मार्गदर्शक शिक्षक देणे, जो सलग ६ वर्षे त्या मुलांच्या सोबत असेल, त्यांच्या वाढीचे टप्पे अनुभवेल आणि त्यांच्याशी कायम संवादात राहील. या ‘मेंटॉर-मेंटी’च्या नात्याने मुलांच्या जडणघडणीला एक भावनिक आणि बौद्धिक आधार दिला. दुसरा महत्त्वाचा प्रयोग म्हणजे ‘सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन’. गुणपत्रिकांच्या पलीकडे जाऊन मुलांच्या सर्वांगीण विकासाचे दर्शन घडवणारे ८ पॅरामीटर्स त्याने निश्चित केले. या वर्षाच्या शेवटी दिल्या जाणाऱ्या रिपोर्टमधील २४ पाने ही मुलाच्या व्यक्तिमत्त्वाचे, त्याच्या सामाजिक व भावनिक विकासाचे सविस्तर वर्णन (Description) असायची. हा प्रयोग बाहेरच्या जगात सुरू होण्याच्या कित्येक वर्षे आधी मिलिंदने प्रबोधिनीमध्ये यशस्वी करून दाखवला होता.

धडपड प्रयोगशाळा (Maker’s Space)

“बुद्धिमान मुलांची केवळ बुद्धीच चालून चालत नाही, तर त्यांचे हातही चालले पाहिजेत,” या विचारातून मिलिंदने ‘धडपड प्रयोगशाळा’ सुरू केली. जागेच्या टंचाईपासून ते साधनसामग्री गोळा करण्यापर्यंत अनेक अडचणींशी लढा देत त्याने ही प्रयोगशाळा उभी केली. आज बाहेरच्या जगात ज्याला ‘अतल टिंकरिंग लॅब’ किंवा ‘मेकर्स स्पेस’ म्हटले जाते, याची पायाभरणी मिलिंदने खूप आधीच केली होती.

एका कर्मयोग्याचा कडक दिनक्रम

मिलिंदची जीवनशैली एखाद्या व्रतस्थासारखी आहे. त्याचा संपूर्ण दिवस अत्यंत शिस्तबद्ध आणि व्यग्र असतो: सकाळी साडेपाच वाजता उठून स्वतःचा व्यायाम, उपासना आणि योगासने करणे हा त्याच्या दिवसाचा पाया असतो. त्यानंतर सकाळी आठ वाजता तो प्रशालेत पोहोचतो. तिथून रात्री साडेआठ, नऊ वाजेपर्यंत सलग साडेतेरा ते चौदा तास प्रशालेचे काम सुरू असते. रात्री घरी परतल्यावरही पुन्हा व्यायाम, वाचन आणि पुढील दिवसाचे नियोजन चालते. सकाळी ५:३० ते रात्री ११:०० असा त्याचा संपूर्ण दिवस पॅक असतो

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटलेला ठसा

मिलिंदचे कार्य केवळ स्थानिक पातळीपुरते मर्यादित राहिले नाही. त्याने शालेय प्रयोगांचे दस्तऐवजीकरण (Documentation) and संशोधन यावर विशेष भर दिला. फिनलंड, मलेशिया, जपान यांसारख्या देशांमध्ये जाऊन प्रबोधिनीच्या प्रयोगांचे पेपर्स शिक्षकांनी सादर केले. सीबीएसई (CBSE) च्या मुख्याध्यापकांसमोर ‘Leadership in Schools’ या विषयावर सादरीकरण केले. आज पाषाणच्या शाळेच्या संदर्भात ११ वी-१२ वी सुरू करणे, निवासी संख्या वाढवणे, ‘कम्युनिटी सेंटर’च्या माध्यमातून आसपासच्या लोकांना जोडणे अशी अनेक मोठी स्वप्ने त्याच्या डोळ्यांत आहेत. प्राचार्य म्हणून दीर्घकाळ काम करताना त्याने केवळ शाळा चालवली नाही, तर अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली. मिलिंद नावाचा हा ‘धडपड्या’ आणि प्रयोगांचे नवनवे क्षितिज शोधणारा कार्यकर्ता शिक्षण क्षेत्राला नेहमीच प्रेरणा देत राहील.

@all
@Milind Naik Sir Jpp

Scroll to Top