“दादा” लोक्स
भाग ४
दादा लोक्स आणि ताई लोक्सही
दिनांक ९ एप्रिल २०२१..
ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, तिथल्या नर्सने सांगितलं की तुम्हाला आज दुसरीकडे शिफ्ट करत आहोत.. कुठे हे सांगितलं नाही आणि तिथे कुठेच रेंज नसल्यामुळे पत्नीशी संपर्क सुद्धा होऊ शकत नव्हता.. आपल्याला ह्या रुग्णालयातून कोण बरं डिस्चार्ज मिळवून देत आहे – अशी उत्सुकता होती. या हॉस्पिटलमध्ये पुरेसा ऑक्सिजनसाठा उपलब्ध नव्हताच, त्याबरोबरीने निघालो तेव्हा तिथली लिफ्टही बंद होती. मोठ्या कष्टाने हॉस्पिटलच्या पायऱ्या उतरून खाली येत असताना मेव्हण्याची बायको गौरी दिसली.. तिनं विचारलं, “कसा आहेस?” त्याचं उत्तर देण्याचं देखील त्राण नव्हतं अंगात!
तिच्याकडे पाहून कसंनुसं हसलो, मेहुण्याच्या मदतीने कसातरी ॲम्बुलन्समध्ये ढकललं स्वत:ला आणि अशक्तपणामुळे उठणाऱ्या वेदनांचा कहर झाला!
“तिथे गेल्यावर प्रांजलशी कनेक्ट हो..” असा संदेश मेव्हण्याने दिला आणि ॲम्ब्युलन्स मधून अस्मादिकांचा प्रवास सुरू झाला! हा प्रवास जवळजवळ पाऊण तास चालू होता.. पण मला मात्र तो युगासारखा भासला. रस्त्यावरच्या खड्यां कचे धडाधड धक्के लागत होते.. मी माझा ऑक्सिजनचा मास्क सांभाळत कसा तरी तग धरून होतो. आपण कुठे रवाना होत आहोत, हे न कळल्याने अस्वस्थही होतोच.. एकच आशादायी किरण तेव्हा होता. तो म्हणजे त्या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीत मी प्रांजलदादाचं नाव ऐकलं होतं! आपल्यासोबत काम करणारा हा जिगरी ‘दादा’ जिथे कुठे आपण पोहोचणार आहोत, तिथे आधाराला असणार आहे! आणि हेच माझ्यासाठी कमालीचं आश्वासक होतं.
मनामध्ये अंदाज लावतच होतो की कदाचित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय अथवा रुबी हॉल क्लिनिक या दोन पैकी आपण कुठेतरी नेले जात असू.. पोहोचल्यावर समजलं की दुसरा पर्याय बरोबर होता! ह्या प्रवासादरम्यान मनात पुढे काय होईल, मिळणारा बेड आता तरी संपूर्ण ऑक्सिजनिशी असेल का, वगैरे बऱ्याच प्रश्नांचं थैमान मनात चालू होतं..
ही कोरोनाची दुसरी लाट होती, जिच्या पंजातून कोणाचीच सुटका होत नाही असं वाटत होतं.. माझी पत्नीदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं तिला घरातून निघता येत नव्हतं, म्हणून तिने माझ्या या उचलबांगडीची महत्त्वाची अशी सर्व जबाबदारी दिली होती प्रांजल दादा अक्कलकोटकर आणि त्याची पत्नी प्रज्ञा प्रभुदेसाई -अक्कलकोटकर या दाम्पत्याकडे! नेहमीच सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या ज्ञान प्रबोधिनी संस्थेमधल्या असंख्य ‘दादा लोक्स’ पैकी हा प्रांजल दादा आणि युवती संघटन सचिव प्रज्ञाताई!
काही काळानंतर ॲम्बुलन्स थांबली! आणि ॲम्बुलन्सची खिडकी उघडली गेली. आत आवाज आला, “सर कसे आहात?” दादाचा हा आवाज ऐकून मनातून हायसं वाटलं! एक मोठा आधार पुढची सर्व जबाबदारी घ्यायला त्याच्या पत्नीसहित उभा होता.. त्यांचं ते औपचारिक काम चालू असेपर्यंत मनामध्ये प्रांजलदादासोबत घालवलेले क्षण तरळत होते.. त्याच्या स्वभावातला उमदेपणा आणि दिलदारपणा तर इथे माझ्यापुढे मूर्तिमंत उभा होता. एवढंच नाही तर माझा जीव वाचवण्यासाठी प्रत्यक्ष धावून आला होता! तेही स्वत:च्या जीवावर उदार होऊन!! त्या दोघांच्या तिथल्या अस्तित्वाने मन आनंदाने आणि असे आपले सगे असल्याच्या अभिमानाने उर भरून आलेले होते!
वीस एक मिनिटं इमारतीच्या खालीच मी ॲम्बुलन्समधेच!! काही औपचारिक गोष्टी पूर्ण झाल्यानंतर मला त्या ॲम्बुलन्समधून बाहेर काढून सहाय्यकांनी त्यांच्या ऑक्सिजनवाल्या बेडवर ठेवलं… हा प्रवासही अद्भुतच होता! मला प्रचंड अशक्तपणा असल्याने मी जागचा उठूही शकत नव्हतो. प्रांजल-प्रज्ञा या दांपत्याकडे पाहून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किमान स्मितहास्य तरी करावं म्हणून कसंतरी मान तिरकी-तारकी केली पण ते तेव्हा या सगळ्या औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आकंठ बुडाले होते!
माझ्या शिरावर असलेली सांसारिक जबाबदारी पार पाडण्यासाठी मी जिवंत तरी राहीन की नाही, अशी शंका मला होती. त्यावेळी केवळ त्या दोघांच्या तिथल्या त्यावेळच्या नाजूक घडीमध्ये मिळालेल्या एका दर्शनाने दूर होऊन गेली! माझी रवानगी थेट आयसीयू मध्ये झाली. तिथे दोन-तीन दिवसात भराभर रिकव्हरी होऊन, मग पुढील तीन दिवस जनरल वॉर्डमध्ये राहिल्यावर पुढच्या लॉकडाऊनच्या दिवशीच १६ एप्रिल २०२१ रोजी घरी सुखरूप परत आलो! त्या काळात असलेल्या बेड्सच्या कमतरतेच्या वातावरणात रुबी हॉल क्लिनिकच्या आयसीयूमध्ये मला बेड मिळावं, यासाठी माझी पत्नी, तसेच ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री मिलिंद नाईक सर आणि आयसीयू प्रमुख डॉक्टर प्राची साठे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे मी आज तुमच्याशी काही हितगुज करतो आहे! वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन प्रांजल दादा आणि प्रज्ञाताई सारखे अनेक “दादालोक्स” मुळेच माझ्यासारख्या कित्येक जणांना अडचणीच्या वेळी मदतीचे हात मिळालेले आहेत.. या सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नांना कोटी कोटी प्रणाम!
तुषार बोरोटीकर
ज्ञान प्रबोधिनी प्रशाला
(विशेष आभार -जयश्रीताई काटीकर)