दादा लोक्स!!
भाग -५
…आणि क्लिकक्लिकाट जाहला!
😊
खरंतर तो आगंतूकच!
अनाहूतपणे तो कसा केव्हा कुठून आला कळलंही नाही. तो इकडे तिकडे आसपास दिसायचा फक्त. एवढंच त्याचं खरंतर अस्तित्व होतं. तो कोणाचा कोण, काही कळलं नाही. तो फक्त होता विभागात. काही लोक आले-गेले त्यांच्यापैकीच कुणाचा तरी असावा तो! पण खूप दिवसांपासून होता तो!
तो कामाचा की बिनकामाचा, त्याचाही कोणाला थांगपत्ता नाही. कधीकाळी आत डोकावलं तर दिसायचा फक्त किंवा कधीकधी कपाटातून काहीबाही काढताना तो मध्येमध्ये करायचा. तेव्हा
जरा वाटायचं याची चौकशी करावी, कोण कुठला विचारावं, गेलाबाजार, उचलून दुसरीकडे तरी ठेवावा. पण कधी असं घडलं नाही…. नशीब एकेकाचं, दुसरं काय?!
दुर्लक्षित – उपरा तो, तसाच राहिला.
मला आठवतंय ना, वेळ सकाळची साधारण अकराची होती, त्यातून शनिवारची, न कर्त्याच्या वाराची… त्यातून कपाटाचं अर्धच दार उघडून त्यातून लॅपटॉप काढायची माझी वाईट खोड! तेच निमित्त झालं आणि पायात पाय अडकून म्हणा किंवा वायरीत वायर अडकून म्हणा तो लॅपटॉपसकट खाली आला !!
अहो कोण म्हणून काय विचारता?!!
तो नाही का, आपल्या हाताखाली असतो नेहमी, अगदी अचूक सांगायचं तर आपल्या पंजाखाली असतो नेहमी; आपली कामं चुटकीसरशी क्लिकक्लिकाट करत करून नाही का देत, तोच तो.
हो बरोबर ओळखलंत – माऊस!!
तर त्याचं झालं असं –
माझ्या टेबलाच्या वर असलेल्या कपाटाचं दार अर्धच उघडून (आळशी नं वन!!) जमिनीपासून साधारण चार फुटांवर असलेला लॅपटॉप मी काढत होते. लॅपटॉप मी बरोबर बाहेर ओढून काढला पण त्याचवेळी –
मोठा आवाज आला आणि काही काळाच्या आत साधारण चार साडेचार फुटांवरून तो गडगडत, आपटत, सपशेल खाली कोसळला!
वही हुआ जिसका हमे डर था!
योग्य वेळी काळजी घेतली असती तर?, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, वगैरे वगैरे विचारांची डोक्यात गर्दी झाली.
खाली बघते तर काय, त्या बिचाऱ्या माऊसची शब्दश: शंभर शकलंच झालेली दिसली!!
(तरी बरं लॅपटॉप माझ्या हातात सुरक्षित होता!)
या शकलांमध्ये (शकलेमध्ये नव्हे हं!)
खेळण्यातल्या गाडीला असतं तसं एक उभ्या दांडीला जोडलेलं एक चाक, चिपा, स्क्रू वगैरे…
आता हा काही वाचत नाही! पण तरीही जड अंत:करणाने मी त्याची बारीक सारीक शकलं वेचून वेचून एकत्र केली. ती एका पिशवीत भरली… हा एक निव्वळ अपघात होता, एवढं काय मनाला लावून घ्यायचं, असा विचार करून त्या पिशवीसकट त्या शकलांना मी तिलांजलीच देणार होते!
पण या सगळ्या प्रकारात थोडीशी धुगधुगी जिवंत होती. आशा होती, भिस्त होती ती सगळी दादावर !! दादांमधल्या दादावर!!
मी थोड्या काळजीनेच आणि भीत भीतच दादाच्या कानावर ही गोष्ट घातली!
“अरे हो का? चालेल ना… बघूया आपण…”
दादाने खूप सहज आणि समजुतदारपणे हे आव्हान स्वीकारलं!!
माझी अर्धी काळजी मिटली. जीव भांड्यात वगैरेही पडला.
शनिवार एक वाजता शाळा बंद झाली. रविवारची सुट्टी.
सोमवारी नेहमीप्रमाणे शाळेत आले.
टेबलापाशी गेले आणि
अहो आश्चर्यम्!!
जी पिशवी मी काळजावर दगड ठेवून दादाकडे दिली होती, ती पिशवी मोठ्या दिमाखाने माझ्या समोरच्या भिंतीवर विराजमान झालेली होती!!
माझे डोळे लकाकले!!
पिशवीतून माऊस बाहेर काढला. वरून खाली, खालून वर, उलटापालटा करून त्याला डोळे भरून न्याहाळला.
क्लिकक्लिकाट होत होता!!!
पटकन लॅपटॉप (यावेळी मात्र कपाटाची दोन्ही दारं पूर्ण उघडून काढला हे वेगळं सांगायला नकोच!) काढला, सुरू केला,
माऊस लॅपटॉपला जोडला,
आणि काय विचारता –
गडी पूर्ण कार्यक्षमतेने क्लिकक्लिकाट करत सज्ज झाला होता!!!
🌱
होय, इथे फक्त तात्त्विक चर्चा घडत नाही तर समस्या निराकरणावर, कर्त्याबुद्धिमत्तेवर भर दिला जातो…
🌱
रचना अभ्यासणे, आरेखन करणे, गोष्टी एकत्रित करणे, तुटलेल्या-फुटलेल्या-नादुरुस्त झालेल्या गोष्टींना पर्याय शोधणे, नवीन गोष्टी मिळवणे, जोडणी करणे, जुळणी करणे, गरजेप्रमाणे सोल्डरिंग,वेल्डिंग-बिल्डिंग… आणि अजूनही खूप काही कदाचित…
खूमोशा दादा!!
दादाबद्दल मी कृतज्ञ!!
🌱
धन्यवाद प्रणव दादा!!
🌱
- जयश्री काटीकर