“दादा” लोक्स
भाग- ३
25 मार्च 2020.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना साथीच्या रोगाला लक्षात घेऊन देशभरामध्ये लॉकडाऊन जाहीर केलं.
२०२० मध्ये हा रोग तेवढ्या प्रचंड प्रमाणात पसरला नाही जेवढा २०२१ मध्ये पसरला! आणि त्याची तीव्रता देखील खूप होती. आपल्याला आता लॉकडाऊन ची सवय झाली आहे आणि आपण पुरेशी काळजी घेत आहोत अशा भ्रमामध्ये असताना एके दिवशी- मार्च 2021 मध्ये रोगाची लागण झालीच! हॉस्पिटलायझेशन वगैरे झाल्यानंतर त्याच्यातून सुखरूप बाहेर पडलो, मात्र 15 दिवसातच आमच्या मातोश्रींना आणि पिताश्रींना देखील त्याची लागण झाली आहे असं लक्षात आलं! दोघांचीही वयं तेव्हा ७८ आणि ६९ अशी असल्याने काळजीच कारण होतंच.. वडिलांना जास्त काही नाही, मात्र आईची लक्षणे पाहता तिला तातडीने एका साध्या रुग्णालयामध्ये दाखल करायला लागलं, कारण सर्वच ठिकाणी बेड्सची कमतरता होती हे सर्वांना आठवत असेलच. गरजेनुसार ऑक्सिजन लावायला लागला.. दोन दिवस ओके गेले मात्र हॉस्पिटल ने जाहीर करून टाकलं की त्यांच्याकडे आता फक्त एका दिवसाचाच ऑक्सिजन बाकी आहे! पुरवठा करणाऱ्या टँकर्सची कमतरता असल्याने तो इतक्यात येणार नाही.
इकडे मातोश्रींना लागणारा ऑक्सिजन वाढत चालला असताना हा असा पेच प्रसंग निर्माण झालेला!
तितक्यातच प्रबोधिनीच्या मुख्य गटावर असं वाचायला मिळालं, की युवक विभागामधून काही उत्साही, आणि तडफदार युवक (म्हणजेच दादा लोक्स!) समाजातली ही परिस्थिती ओळखून सर्व रुग्णालयांशी संपर्क साधून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या बेड्सचा एक मोठा डेटाबेसच आधीच तयार करून बसले आहेत! जर कोणाला बेड्सची आवश्यकता असेल तर त्यांच्या नातेवाईकांनी आम्हास संपर्क साधा आणि आम्ही शक्यता असलेली दोन-तीन ठिकाणं नुसती सुचवू असच नाही तर त्या रुग्णालयांशी संपर्क साधून तिथे बेड मिळण्यासाठी म्हणून विशेष प्रयत्न करू आणि त्याबद्दल दोन्ही बाजूंशी संप्रेषण देखील करू!
झालं! ताबडतोब दिल्या गेलेल्या क्रमांकावर संपर्क साधला आणि आपले दादा लोक्स कामाला लागले! तातडी पाहता “आम्हाला दीड तास द्या” असं म्हटलं आणि एका तासाभरातच एका दादाशी संपर्क झाला!
त्याने दोन-तीन पर्याय दिले त्यापैकी एक रुग्णालय होतं- ते म्हणजे नवी पेठेतील कॉलनी नर्सिंग होम! मात्र तिथे आयसीयू सुविधा नसणार होती.. लगेच सूत्र हलवून मातोश्रींना तिथे हलवण्याची व्यवस्था केली..
कॉलनी नर्सिंग होमशी मातोश्रींचं आणि माझंही वेगळं नातं होतं, कारण ते माझं जन्मस्थानच होतं!..
ऑक्सीजन संपत आलेल्या त्या आधीच्या रुग्णालयामधून दुसरीकडे कुठे हलवावं असा त्या काळाचा पेच असताना युवक धावून आले आणि लगेचच तिथे बेड मिळाला आणि तोही चांगल्या सुविधांसहित!
पुढे तीनच दिवसात अधिक ऑक्सिजन आणि आयसीयू ची गरज लागल्याने तिथून हलवून अजून एका व्यक्तीच्या पुण्याईने भारती हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला आणि त्यानंतरच्या प्रदीर्घ संघर्षानंतर, जवळजवळ सव्वा महिन्याने- 14 जून 2021 ला मातोश्री बर्या होऊन घरी आल्या आणि आता सुद्धा त्यांच्या दैनंदिन गोष्टी उत्तम प्रकारे करत आहेत!
भारती हॉस्पिटल च्या आधी कॉलनी नर्सिंग होम मध्ये त्या तीन दिवसांच्या अतिशय नाजूक काळामध्ये आपल्या दादा लोक्स च्या मदतीने जर बेड मिळालं नसतं, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती!..
आमचं सर्व संप्रेषण whatsapp वरून चालू होतं; सहज उत्सुकता म्हणून ‘तुझं नाव काय?’ असं दादाला विचारल्यावर समोरून उत्तर आलं ध्रुव लोखंडे!
क्षणार्धात ध्रुवला पाचवीपासून नववीपर्यंत शिकवलेल्या सर्व गोष्टी आणि त्याची प्रबोधिनीतली वर्ष डोळ्यासमोरून गेली!..
ही पुण्याई आहे ज्ञानप्रबोधिनीची
ही पुण्याई असते शिक्षक असण्याची- या दोन्हींची प्रचिती आली आणि मन भरून आलं!.. मी म्हटलं- “अरे ध्रुव! देवासारखा मदतीला धावून आलास बाबा!”.. तेव्हा हा दादा म्हणतो -” सर बास का! तुम्हाला मदत नाही करणार तर अजून कोणाला करणार! आणि थँक्स वगैरे तर अजिबातच म्हणू नका!”
कोविडच्या या अडचणीच्या परिस्थितीमध्ये आपल्या युवकांनी एकत्र येऊन ह्या वॉर रूम ची स्थापना केली होती.. अनिरुद्ध वाघ, विश्वेश कुलकर्णी, स्वरूप जोशी आणि स्वप्निल इंदापूरकर हे त्यातले प्रमुख कोविड वॉरियर्स! या सर्वांनी ध्रुवसारख्या लोकांना आपल्या मार्गदर्शनाखाली घेऊन अशा कित्येक जणांचे प्राण वाचवण्यासाठी हातभार लावला!
या सर्व दादा लोक्स च्या प्रयत्नांना आणि ज्ञानप्रबोधिनीच्या पुण्याईला कोटी कोटी प्रणाम!🙏🙏
-तुषार बोरोटीकर